एसटीचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची कार्यतत्परता व्हॉटसअप संदेशावरील माहितीनंतर तत्परतेने परिपत्रक काढून समस्या सोडवली !
एसटीचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची कार्यतत्परता व्हॉटसअप संदेशावरील माहितीनंतर तत्परतेने परिपत्रक काढून समस्या सोडवली !
राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची कार्यतत्परता समोर आली आहे. अधिस्वीकृत पत्रकारांना एसटीच्या शिवशाही बसेस मध्ये उद्भवणाऱ्या समस्येबाबत व्हॉटसअप वरुन रात्री सव्वा अकरा वाजता संदेश पाठवल्यानंतर त्यांनी तत्काळ दुसऱ्या दिवशी सकाळी याबाबत परिपत्रक काढण्याचे निर्देश देत समस्येचे निराकरण केले.
एसटीच्या शिवशाही बसमध्ये अधिस्वीकृती पत्रिका धारक पत्रकारांना एसटीने दिलेला वैध पास असताना देखील प्रवास करण्यास नकार दिला जातो. याबाबत एसटी कडून परिपत्रक आले नसल्याचे वाहक सांगतात. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना त्रास होत असल्याबाबत तक्रार एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे मुंबई मराठी पत्रकार संघाचे संयुक्त कार्यवाह खलील गिरकर यांनी व्हॉटसअप संदेश पाठवला होता. त्याची तत्काळ दखल घेत उपाध्यक्षांनी याबाबतचे सुस्पष्ट परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले व त्यानुसार एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी तसे परिपत्रक काढले.
अधिस्वीकृत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सवलतींबाबत एसटीच्या अधिकृत वेबसाईट वर स्पष्ट माहिती असताना देखील परिपत्रक नसल्याने वाहकांकडून आक्षेप घेतले जात होते. त्याकडे खलील गिरकर यांनी लक्ष वेधले होते त्याची तत्काळ दखल घेत एसटीच्या उपाध्यक्षांनी याबाबतचे परिपत्रक काढले.
शिवशाही (शयनयान व आसनी) बसमधून अधिस्वीकृत पत्रकारांना विनामूल्य प्रवासाची सवलत दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब गंभीर असून यामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे.
सदरची बाब अत्यंत महत्त्वाची समजून कार्यवाही करावी व प्रवाशांकडून तक्रार उद्भवणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी दिले आहेत.