मुंबई महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्यात यावे, विधानपरिषद आमदार सुनील शिंदे !
मुंबई महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्यात यावे, विधानपरिषद आमदार सुनील शिंदे !
संपूर्ण मुंबई नगराची राणी बृहन्मुंबई महानगर पालिका. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कितीतरी स्वतःचे मालकीचे भूखंड मुंबई नगरात आहेत. त्यापैकी सुमारे साडेचार हजार भूखंड भाडेपट्टा कराराने दिले आहेत. यातील बहुतांशी भूखंडाचे लिज सन २०१३ मध्ये संपले आहे. करार संपूनही बृहन्मुंबई महापालिकेने हे भूखंड अद्यापही ताब्यात घेतलेले नाहीत. या भूखंडापैकी एक असलेल्या महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदान हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ऐसपैस आहे. नेहमी तिथे घोड्याच्या शर्यती होत असतात. इतर वेळेस आजूबाजूच्या परिसरातील लोक मॉर्निंग व एव्हनिंग वॉकसाठी येत असतात.
अशा ह्या रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी शिवसेनेने मांडला होता. महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानाचा भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब या संस्थेला ९९ वर्षाच्या करारावर दिला होता. सदरहू रेसकोर्स वरील एकूण ८ लाख ५५ हजार १९८ चौरस मीटर जागेपैकी २ लाख ५८ हजार २४५ चौरस मीटरची जागा ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची असून ५ लाख ९६ हजार ९५३ मीटरची जागा राज्य सरकारची आहे.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. मुंबईचे विशिष्ठ स्थान जगाच्या नकाशात आहे. इंग्रजांच्या काळात उभारलेल्या देखण्या वास्तु तसेच बरीच सुंदर पर्यटन स्थळे आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या स्वप्न नगरीत मुंबईत दररोज देश, विदेशचे पर्यटक भेट देऊन जीवाची मुंबई करतात. अशा ह्या जादुई नगरीचे आकर्षण देश विदेशच्या मनात आहे. त्यामुळे रेसकोर्स येथे जागतिक दर्जाचे उद्यान होण्याची आवशक्यता आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्या संकल्पने नुसार कोणत्याही बांधकामा शिवाय 'द हाईड पार्क' सारखी मोकळी जागा असणारी उद्यान विकसित करण्याची योजना होती. या ठिकाणी मुले, जेष्ठ, रनर, महिला योगाप्रेमी, संगीतप्रेमी, कलाप्रेमी, पेट हॉर्स प्रेमींसाठी मोकळे उद्यान तयार करण्यात येणार होते. बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात या बाबतचा प्रस्ताव मंजुर झाला होता. राज्य सरकारने भूखंडाबाबत काढलेल्या नव्या शासन निर्णयामुळे नुतनीकरणाचा अधिकार पालिकेकडे राहिला नाही. त्यामुळे रेसकोर्सच्या भूखंडाचे पालिकेला नूतनीकरण करता येणार नाही. नूतनीकरण व त्यात बदल करावयाचा असल्यास राज्य सरकारची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. परंतु अद्याप राज्यशासनाने मंजुरी न दिल्याने मुंबई शहराचा अविभाज्य अंग असलेली जागा विकासकांना आंदण देणार आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
यास्तव घोड्याच्या शर्यतीसाठी वापरण्यात येणारा महालक्ष्मी रेसकोर्स वरील भूखंड ताब्यात घेण्यासाठी आणि त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्याची मंजुरी मिळण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेमार्फत राज्यशासनाकडे पाठपुरावा करता यावा यासाठी मुंबई विधानपरिषदेचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्री सुनील शिंदे यांनी जनतेतर्फे राज्य सरकारकडे मागणी केली आहे.