
साबू सिद्दीक महाविद्यालयात आयोजित कोकण मेळावा उत्साहात साजरा !!
साबू सिद्दीक महाविद्यालयात आयोजित कोकण मेळावा उत्साहात साजरा !!
मुंबईतील साबू सिद्दीक महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कोकण मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस हा मेळावा सुरु होता. कोकणी संस्कृतीची ओळख करुन देणे, कोकणी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे व समाजाची एकजूट करणे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी बशीर हजवानी, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, कोकण बॅंकेचे अध्यक्ष नजीब मुल्ला, उपाध्यक्ष आसिफ दादन, डॉ. जहीर काझी, मुश्ताक अंतुले, आर.सी.घरत, डॉ. मोहम्मद अली पाटणकर व मान्यवर उपस्थित होते. लेझिम नृत्याला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.
मेळाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आझमी, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष नसीम सिद्दीकी, आयपीएस अधिकारी कैसर खालीद, सुफियान वणू यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बॅंकिंग, उद्योग व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याबद्द्ल इस्माईल दादन यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले व शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या जीवनाचा प्रवास चित्रफित व एकांकिकेच्या माध्यमातून दर्शवण्यात आला.
२ हजार पेक्षा अधिक जणांनी जॉब फेअरमध्ये नोंदणी केली. ५६ विविध कंपन्यांनी यासाठी स्टॉल लावले होते त्यामध्ये ३०० हून अधिक जणांना नोकरीचे नेमणूकपत्र देण्यात आले. विवाह इच्छुक मंडळात ५०० हून अधिक जणांनी नोंदणी केली. वकीलांची व डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. मेळावा यशस्वी होण्यासाठी आशिक गरदी, इम्रान अल्वी, कमाल मांडलेकर, सलीम अलवारे व इतरांनी परिश्रम घेतले.
कोकणी माणूस विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. कोकणातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून उदयोन्मुख तरुणांना मार्गदर्शन करणे, सहकार्याने समाजाचे हित साधणे या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.