वसई विरार मध्ये इलेक्ट्रिक बस धावणार??

वसई विरार मध्ये इलेक्ट्रिक बस धावणार??

           वसई विरारमध्ये विविध कारणांमुळे वाढणारे प्रदुषण कमी करण्यासाठी पालिकेने विविध उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वछ वायू कार्यक्रमा अंतर्गत पालिकेने सादर केलेल्या प्रदूषण नियंत्रणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पालिकेला वायू प्रदूषण नियंत्रणासाठी एकुण 32 कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे.

    या निधीतून पालिकेने मियावकी वने तयार करणे बहुउद्धेशीय वाहन तळ तयार करणे या सह इतर उपाय योजना राबविण्यासाठी सुरवात केली आहे. यासोबत या निधीतुन पालिकेने सीएनजी बस आणि इलेक्ट्रिक बस वसईच्या रस्त्यावर उतरविण्याचाही निर्णय घेतला. यामध्ये एकूण १५ सीएनजी बस आणि तीन इलेक्ट्रिक बसचा सुद्धा समावेश होता. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया देखील सुरू केली. मात्र सीएनजी बस ऐवजी पूर्णपणे पर्यावरण पूरक असलेल्या फक्त इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजी बस आणि इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. चालू वर्षांत या बस येणार असून प्राथमिक तत्वावर प्रथम आठ बस पालिका हद्दीत दाखल होणार असल्याचे पालिका आयुक्त गंगाधरन डी. यांनी सांगितले.

      या बस महामार्गावर म्हणजेच लांब पल्याच्या मार्गावर प्रवासासाठी वापरण्यात येणार आहेत. पुढील वर्षी उर्वरीत बसची खरेदी करण्यात येईल अशा प्रकारे इलेक्ट्रिक बसचे जाळे निर्माण झाल्यास शहरातील प्रदूषण नियंत्रणात राहील असा विश्वास आयुक्तांनी निर्माण केला आहे. सीएनजी बस  दाखल करण्यात येणार असल्याने पालिकेने सीएनजी पंप बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या बस रद्द करुन केवळ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार असल्याने आता यासाठी चार्जिंग केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे इंधनाची बचत देखील होणार आहे. प्रदूषण नियंत्रणामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे. वायु प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. त्यामार्फत विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी