नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ येथे वृक्ष वाटप आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न !!

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ येथे वृक्ष वाटप आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न !!

     आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम !

       मुंबई (रवींद्र मालुसरे) पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम संपूर्ण जग अनुभवत असून त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे म्हणून झाडे लावणे व झाडे जगवणे हे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गरजेचे झाले आहे असा संदेश सुप्रसिद्ध उद्योगजक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय उतेकर यांनी पोलादपूर येथे आयोजित केलेल्या रोपवाटिका वाटप कार्यक्रमाप्रसंगी आपल्या भाषणातुन दिला. 'आपली माती आपली माणसं' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राज पार्टे हे समाजजीवनला आवश्यक असा हा उपक्रम गेली स्तुत्य उपक्रम गेली अनेक वर्षे आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने करीत आहेत. आषाढी दिंडी प्रमाणे ही वृक्षदिंडी विद्यार्थ्यांनी वाडीवस्तीवर पोहोचवावी जेणेकरून आपली मायभूमी सुजलाम सुफलाम होईल असेही आवाहन त्यांनी केले. 

         तर पोलादपूर तालुका शिवसेना संपर्क प्रमुख किशोर जाधव म्हणाले की, केवळ झाडे लावून उपयोग नाही त्यांचे संगोपन पर्यावरणाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे, यापुढे मोठ्या प्रमाणावर या उपक्रमाअंतर्गत दत्तक वृक्ष(वृक्षसंवर्धन पालकत्व) ही संकल्पना योजना स्वीकारण्यात यावी. त्यानुसार शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांनी  झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात स्वीकारावी. यामध्ये प्रत्येकाने स्वतः लागवड केलेल्या एक झाडाचे संगोपन वर्षभर करून त्यांचा पुढील वर्षी वाढदिवस साजरा करावा.  

      नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावी मुंबईतील हजारो युवकांनी 'आपली माती आपली माणसं' या स्थापन केलेल्या सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्ष वाटप व उत्तीर्ण विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या वतीने हजारो विविध वृक्षांच्या रोपट्यांचे शालेय विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ नागरिकांना वाटत करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवातीला नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

      संस्थेचे अध्यक्ष राज पार्टे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जगभर पटू लागले आहे. त्यामुळेच आपल्या मायभूमीत जनजागृती व्हावी याहेतूने हा कार्यक्रम होत आहे. 

      यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, नीलेश कोळसकर, संतोष रिंगे, रामदास कळंबे, नीतेश शिंदे,  उमरठ हायस्कूल, देवळे हायस्कूल, साखर हायस्कूल, मोरसडे हायस्कूल आदी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
बातमीकार