
पालघर जिल्ह्यात २१ डिसेंबरला ४६ ग्राम पंचायतीच्या पोट निवडणुका !!
पालघर जिल्ह्यात २१ डिसेंबरला ४६ ग्राम पंचायतीच्या पोट निवडणुका !!
पालघर जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायतीच्या ९६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी या पोट निवडणुका होणार असून त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी घोषित होणार आहे. या ग्रामपंचायती मध्ये आचार संहिता घोषित करण्यात आली आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गाची अतिरिक्त रिक्त जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेची सुधारणा २२ नोव्हेंबर पर्यंत केली जाणार आहे. तर ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ते दुपारी ३ वाजेपर्यंत या रिक्त जागेसाठी नामनिदर्शनपत्रे दाखल करणण्यात येतील.
७ डिसेंबर सकाळी ११ वाजे पासून दाखल झालेल्या नामनिदर्शनपत्रांची छाननी केली जाईल ९ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिदर्शनपत्रे उमेदवारांना मागे घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह दिले जाणार आहे. ज्या ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये करोना रुग्णांची संख्या नगण्य आहे. अश्या ठिकाणीच निवडणूक प्रक्रिया पार पाडावयाची आहे. ज्या ग्रामपंचायतिची मुदत संपण्यासाठी ६ महिन्या पेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. अश्या ठिकाणी निवडणूक घेतली जाईल. नागरिकांचा मागास प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यापूर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकूण आरक्षण २७ टक्के ठेवावे असे निवडणूक आयोगा मार्फत सांगण्यात आले आहे.
ज्या ग्रामपंचायती मध्ये ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ७ एवढी असेल त्या ठिकाणी एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असेल. जेथे नऊ सदस्य संख्या आहे तेथे दोन जागा राखीव असतील. अकरा सदस्य संख्या असेल तेथे दोन जागा, तेरा सदस्य संख्या असेल तेथे तीन जागा, १५ सदस्य संख्या असेल तेथे चार जागा, आणि १७ सदस्य संख्या असेल तेथे चार जागा, अश्या आरक्षण जागेची अंमल बजावणी व गणना करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिलेले आहेत. याच बरोबर नागरिकाचा मागास प्रवर्गाच्या अतिरिक्त ठरणाऱ्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाला आरक्षित केल्या नंतर महिलांसाठी आरक्षित जागांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या ५७% राखली जाईल याची दक्षता जिल्ह्याने घ्यावयाची आहे असे आदेशात म्हटले आहे.