
चोर समजून आदिवासी स्रियांना मारहाण करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक अखेर निलंबित !!
चोर समजून आदिवासी स्रियांना मारहाण करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक अखेर निलंबित !!
आदिवासी महिलांना चोर समजून मारहाण करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद वाघ यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी वसई तालुक्यातील पापडी येथे आठवड्याचा बाजार भरतो, १९ नोव्हेंबर शुक्रवारी वसईच्या पापडी बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या ६ आदिवासी महिलांना चोर समजून पापडी चौकीत नेऊन त्यांना दांड्याने मारहाण केली होती. लाल बावटा पक्षाचे तालुका सचिव कॉ. शेर वाघ यांनी हा मुद्धा लावून धरला होता. शेकडो आदिवासी स्त्री पुरुषांनी वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. ह्या मोर्चाची दखल घेऊन मीरा -भायंदर वसई विरार चे अप्पर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांचे निलंबन केले आहे. मारहाण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी होऊन चौकशीत निरपेक्षपणे शिक्षेची तरतूद असल्याचे ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी वसईत आलेल्या सहा आदिवासी महिला १९नोव्हेंबर ला भाजीपाला घेण्यासाठी पापडी बाजारात गेल्या होत्या. या आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. ह्या सर्व महिला पालघर जिल्ह्यात कासा परिसरात राहणाऱ्या आहेत. बेबी नारायण वावरे, दिपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजरा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारू सुभाष डोकफोडे, अशी या आदिवासी महिलांची नावे आहेत.
१९ नोव्हेंबर ला काम नाही भेटले म्हणून पापडीच्या आठवडी बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे कपडे, राहणीमान पाहून त्या चोरी करण्यासठी आल्या आहेत का ? अश्या संशयावरून तेथील पोलीस कर्मचारी यांनी या महिलांना रिक्षात बसवून बाजूच्या पापडी पोलीस चौकीत नेले. तेथे त्यांना पोलीसानी दांड्याने बेदम मारहाण केली, असा आरोप या आदिवासी महिलांनी केला होता. आदिवासी महिलांना मारहाण झाल्याने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी व आदिवासी माणसांसोबत माणसाप्रमाणे वागावे अशी मागणी करण्यात आली होती.