
वसई कला क्रीडा महोत्सवाची तयारी जोरात अजूनही शासन परवानगीची प्रतीक्षा !!
वसई कला क्रीडा महोत्सवाची तयारी जोरात अजूनही शासन परवानगीची प्रतीक्षा !!
वसई कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाची तयारी जोरात सुरू असली तरी या महोत्सवाला शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने, खेळाडु सह आयोजक ही संभ्रमात पडले आहेत. वसई तालुका कला क्रीडा महोत्सव समितीची बैठक गणपतराव क्रीडा भवन मध्ये पार पडली.
महोत्सव आयोजनासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. यंदाचा महोत्सव १८ वर्षावरील व दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या स्पर्धकांना घेऊन करायचे ठरविण्यात आले. बंदीस्त सभागृहात घेता येऊ शकणाऱ्या स्पर्धकांबाबत चर्चा करण्यात आली. परंतु करोनाचा नवीन प्रकार ओमीक्रॉंनच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगर पालिका आयुक्तांकडुन केंद्र व राज्य शासनाच्या करोना प्रतिबंधक मार्गदर्शक नियम अभ्यासून शासनाची परवांनगी देण्यांत येणार आहे.
आयुक्तांकडून या संबधी राज्यशासनाकडून माहिती घेण्यात येत असल्याचे कळले. करोनाची परिस्तिथी नियंत्रणात असली व त्या प्रमाणे परवानगी मिळाली तरच महोत्सवाचे आयोजन करू अन्यथा परिस्तिथी गंभीर असल्यास महोत्सव आयोजनाचा अजिबात आग्रह नसेल. अशी भूमिका आयोजकांतर्फे आयुक्तांकडे मांडण्यात आली.
महोत्सवाचा उद्देश गेली दोन करोनाच्या महामारीमुळे दूर राहिलेल्या स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देणे हा असला तरी करोना विरुद्ध सरकारला सहकार्य करण हे प्रथम कर्तव्य असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे अजून तरी कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन अनिश्चित असले तरी शासनाने परवानगी दिल्यास महोत्सव भरविण्यास सर्व कार्यकर्ते सज्ज असल्याचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी आणि संघटक सचिव संतोष वळवईकर यांनी सांगितले. या बैठकीस माणिकराव दोतोंडे, अनील वाझ, नगरसेविका सौ.ज्योती धोंडेकर, मकरंद सावे, वसंत मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.