
वसईत रेती माफियांवर कारवाईची संक्रात !
वसई महसुल विभागाने वसई पूर्वेस खानिवडे गावाजवळील खाडी किनाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने रेती माफियांवर धडक कारवाई केली. सोमवार १० जानेवारी अचानकपणे केलेली कारवाई म्हणजे रेती माफियांना संक्रांती अगोदरच दणका दिलेला आहे. वसई तालुक्याच्या तहसीलदार उज्वला भगत व त्यांचे तलाठी मंडळ अधिकारी व इतर महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी केलेल्या अचानक एकदम धडक कारवाईत या खाडी लगत उभ्या असलेल्या ११ बोटी व १० संक्शन पंपाच्या इंजिनमध्ये साखर मिश्रीत पाणी टाकून अक्षरशः निकामी केल्याची माहिती वसई तालुक्याच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी दिली.
करोना काळात अवैध रेती उपसा करणाऱ्यांच्या नाड्या आवळल्याची वल्गना करणाऱ्या पोलीस प्रशासनाने या घटनेचे चांगलंच पितळ उघडं पाडलं आहे. खाडी किनारी आजही अवैध रेती उपसा सुरू असल्याच उघड झालं असून, वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांना सोमवार १० जानेवारी रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा नजीकच्या खनिवडे गावानजीक चिमणे येथील खाडी लगत अवैध रेती उपासाची माहिती मिळाली होती.
अखेर माहिती मिळताच आपल्या महसूल टीम समवेत घटनास्थळी पोहचल्यावर तेथे खाडी किनारी संक्शन पंपाच्या काही बोटी आढळून आल्या. त्यावेळी रेती माफियांनी तहसीलदार व त्यांच्या टीमला पाहून त्या बोटी तेथेच टाकुन अवैध रेती उपसा करणारे सर्वजण धूम ठोकून पळून गेले. वसई तहसीलदारांनी खाडी लगत उभ्या असलेल्या सर्व ११ बोटी, आणि१० संक्शन पंप नादुरुस्त केल्या आहेत. तहसीलदार यांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून वसई तालुक्यातील खाडी किनारी असा अवैध रेती उपसा सुरू असेल तर कारवाई करण्यात येईल आणि असे धाडसत्र सुरूच राहणार असल्याचेही तहसीलदार उज्वला भगत यांनी सांगितले.