
अनधिकृत बांधकामाला अभय देण्यासाठी रुग्णालयाचा घाट
वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामावर महापालिकेवर कारवाई होऊ नये, यासाठी या बांधकामात रुग्णालये अथवा शाळा सुरू करण्याची नवी शकलं भूमाफियांनी लढविली आहे. त्यामुळे पालिका प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका शहरातील अनधिकृत बांधकामाला नोटीसा बजावत आहे. तर काही बांधकामावर कारवाई करत आहेत. ह्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. यावर तोडगा म्हणून आता या बांधकाम व्यवसायिकांनी अनधिकृत इमारतीत रुग्णालये सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेकडून या बांधकामाला शास्ति लावत घरपट्टी दिली जाते.
या घरपट्टीच्या आधारे पालिकेचा वैदयकीय विभाग रुग्णालयांना परवानगी देत आहेत. विरार नाला सोपारा पूर्व ९० फुटी रस्त्यावर ओसवाल नगरी परिसरात श्वेता रुग्णालय सुरू केले जात आहे. या रुग्णालयात ट्रामा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. असा फलक रुग्णालयाने लावला आहे, या रुग्णालयाने परवानगी मिळवण्यासाठी आपली कागदपत्रे महानगरपालिका वैद्यकीय विभागाकडे सादर केले आहेत. पण पालिकेने त्रुटी दाखवत परवानगी राखून ठेवली आहे. सदरची इमारत ही अनधिकृत असून त्यात पालिकेची परवानगी नाही.
तसेच रुग्णालय सुरू करण्यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी नाही, तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने अग्निशमन दलाकडे ही ना हरकत दाखल्या करीता ही अर्ज केला आहे. पण अग्निशमन दलाने अर्ज राखून ठेवला आहे. असे असतानाही रुग्णालयाचे कांम पूर्ण झाले असून लवकरच हे रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे.