
काशिमिरा पोलीस स्टेशन ने केली कमाल ! एकूण ३६,९०,७४,०००/रकमेचा (मॅफेड्रोन) केला जप्त !!
काशिमिरा पोलीस स्टेशन ने केली कमाल ! एकूण ३६,९०,७४,०००/रकमेचा (मॅफेड्रोन) केला जप्त !!
गुन्हे शाखा कक्ष १ काशिमिरा मार्फत सात आरोपींना अटक करून अंमली पदार्थ बनविणाऱ्या फॅक्टरीचा (लॅब) शोध घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव असलेला एकूण (३६,९०,७४,०००/-) रुपयांचा अंमली पदार्थ केला जप्त !
दिनांक १८/१०/२३ रोजी काशिमिरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे गुन्हे शाखा यांना आपल्या गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळाली की, हॉटेल विन्यासा रेसिडेन्सी, बीपी रोड भाईंदर पूर्व तालुका जिल्हा ठाणे येथे काही इसम आठ, दहा दिवसापासून वास्तव्य करीत असून त्यांच्याजवळ अंमली पदार्थ आहेत व ते मीरा भाईंदर पूर्व येथे पदार्थाची विक्री करीत आहेत. तसेच त्यांच्याकडे अग्निशस्त्र असल्याची ही माहिती मिळाली. ही माहिती मिळताच वरिष्ठांचे आदेश व त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कारवाई करता, सनी भरत सालेलकर वय वर्ष २८, व्यवसाय बेरोजगारी, राहणार मुळगाव सालेलकर वाडी तालुका खेड, रत्नागिरी. विशाल सतीश गोडसे, वय वर्ष २८ राहणार, पनवेल, तालुका रायगड. मूळगाव कातर खटाव, जिल्हा सातारा. दीपक जितेंद्र दुबे, वय वर्ष २६, राहणार दहिसर पूर्व, मुळगाव सारनाथ उत्तर प्रदेश व शहबाज शेवाई, वय वर्ष २९, राहणार आनंद नगर दहिसर पूर्व याच्या ताब्यात असलेले एकूण २५७.७ ग्रॅम एमडी विकून मिळालेली रोख रक्कम, एमडी विक्री करता वापरलेली एक मोटर सायकल, तसेच सनी सालेलकर याच्याकडे सापडलेले एक गावठी पिस्टल मॅक्झिन व दोन जिवंत राऊंडस हे जप्त करण्यात आले. दिनांक २१/२०/२३ रोजी त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपितांकडून कसून तपास करण्यात आला. तपासात निष्पन्न झाले की आरोपी तनवीर निसार अहमद चौधरी वय वर्ष ३३ व्यवसाय इव्हेंट ऑर्गनायझेशन राहणार भाईंदर पूर्व तालुका जिल्हा ठाणे याच्याकडून १०२ ग्रॅम एमडी (मॅफेड्रोन) विकून मिळवलेली रोख रक्कम तसेच एमडी विक्रीसाठी वापरलेले चार चाकी वाहन जप्त करण्यात आले. तनवीर यास २१/१०/२३ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी तनवीर याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी गौतम गुनाधर घोष, वय वर्ष ३८, व्यवसाय व्यापार, राहणार भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे याचा सहभाग निष्पन्न झाल्याने गौतम घोष यालाही अटक करण्यात आली.
अटक आरोपी गौतम घोष यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी समीर चंद्रशेखर पिंजार, वय ४५ वर्ष, व्यवसाय सिविल कॉन्ट्रॅक्टर, राहणार नादब्रह्म बिल्डिंग, भास्कर आळी, वसई याच्याकडे केलेल्या तपासामध्ये सर्वे नंबर २६४/२ए मोखाडा पालघर येथे आरोपी चंद्रशेखर पिंजार याने बांधलेल्या घरात एमडी (मॅफेड्रोन) बनविण्यासाठी बनवलेली लॅब मिळून आली. त्यामध्ये १८१०० ग्रॅम एमडी तसेच एमडी तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि रासायनिक उपकरणे मिळून आली. ती जप्त करण्यात आली असून त्याला दिनांक २२/१०/२३ रोजी अटक करण्यात आली आहे.
तसेच अटक केलेला आरोपी सनी भरत चालेलकर याच्या निवेदनाप्रमाणे रुपये ९,६०० किमतीचे एक गावठी पिस्टल, तीन मॅगझीन व बारा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सदरची कामगिरी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री अमोल मांडवे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ येथील पोलीस निरीक्षक श्री अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, सहाय्यक फौजदार राजू तांबे संदीप शिंदे, पोलीस हवालदार संजय शिंदे, संतोष लांडगे पुष्पेन्द्र थापा, विजय गायकवाड सचिन सावंत, समीर यादव, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते व सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण (सायबर गुन्हे) यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.