
अल्पवयीन मुलींची तुंगारेश्वर डोंगरातून केली सुटका !!
अल्पवयीन मुलींची तुंगारेश्वर डोंगरातून केली सुटका !!
वसई गावातील दोन अल्पवयीन बेपत्ता झालेल्या बहिणींची माणिकपूर पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे.
तुंगारेश्वर जंगलात बुधवारी रात्री त्या आढळून आल्या. या मुलींना फुस लावून पळून नेणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा या मुलींच्या वडिलांच्या तबेला काम करणारा कामगार आहे. वसईतील खेळणे गावात राहणाऱ्या 13 व 15 वर्षाच्या या दोघी सख्या बहिणी मंगळवारी पहाटेपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या घरात काम करणारी पंधरा वर्षीय मदतनीसही बेपत्ता होती.
या मुलींच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे माग काढला असता, मुली नालासोपारा स्थानकात उतरून रिक्षाने तुंगारेश्वरच्या जंगलात गेल्या होत्या, त्यांच्यासोबत दोन मुले होती. बुधवारी रात्री पोलिसांनी तुंगारेश्वर चे जंगल पिंजून काढले. आणि एका झोपडीतून या मुलींची सुखरूप सुटका केली. या मुलींच्या वडिलांचा तबेला असून त्यात काम करणाऱ्या दोन मुलांनी या दोन बहिणींना फूस लावून नेले होते. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे तर दुसरा 19 वर्षीय आहे. त्याला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मुलींसोबत कोणताही गैरप्रकार झाले नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू माने यांनी स्पष्ट केले.