
नाला सोपाऱ्यात पार्किंग मधील चारचाकी वाहन चोरणारी टोळी अटकेत !
नाला सोपाऱ्यात पार्किंग मधील चारचाकी वाहन चोरणारी टोळी अटकेत !
नालासोपारा महामार्गावरील हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणी पार्किंग मध्ये उभी केलेल्या वाहनाचे लॉक तोडून वाहन चोरी करून फरार होणाऱ्या टोळीचा पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने भांडाफोड केला आहे. यात टोळीतील दोन जणांना अटक केले असुन त्यांच्याकडून २ लाख, ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या टोळीने आणखी किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास सुरू असल्याची माहिती पेल्हार चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली आहे.
सरवर फतेह मोहम्मद खान आणि वासीफ साबीर अली अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. चार चाकी वाहनाच्या चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी महेंद्र शेलार यांचे एक स्वतंत्र पथक निर्माण केले होते.
तांत्रिक बाबी आणि गुप्त बातमीदार यांच्या माहिती वरून, तपास करीत असताना यातील सरवर खान या आरोपीला प्रथम ताब्यात घेतले. त्यानंतर उत्तर प्रदेश प्रतापगड येथुन दुसरा आरोपी वासिफ अली याला ताब्यात घेतले, दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी एक बोलेरो कार, स्विफ्ट कार, अशा दोन कार चोरल्याची कबुली दिली आहे.
तसेच या चोरट्यांवर मुंबई शहर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणीही वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.