
खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना, अर्नाळा पोलिसांनी केले जेरबंद !
खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना, अर्नाळा पोलिसांनी केले जेरबंद !
वसई तालुक्यातील अर्नाळा येथे राहणाऱ्या श्री. प्रकाश भास्कर वझे यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात दिनांक १० डिसेंबर २१ रोजी तक्रार नोंदवली की दिनांक १० डिसेंबर २१ रोजी श्री. प्रकाश भास्कर वझे हे सकाळी ८:१५ च्या सुमारास वाडीत (भाजीच शेत) येथे गेले असता त्यांनी बघितले की त्यांच्या वाडीच्या बावखळात (शेतात खड्डा खोदून केलेली विहीर) एक अज्ञात इसम पाण्यात बुडुन उताणे स्थितीत पडलेला असून मयत झालेला आहे. ते पाहताच प्रकाश वझे यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात लागलीच जाऊन पाहिलेल्या घटनेची तक्रार केली असता अर्नाळा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली.
त्यांनी प्रेताची पाहणी केली असता प्रथमदर्शनी दिसून आलेल्या स्थिती वरून अर्नाळा पोलीस ठाणे येथे मयत इसमाच्या आकस्मित मृत्यू झाल्याची सीआरपीसी १७४ प्रमाणे दिनांक १२ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
सदर अनोळखी मयत इसमाच्या डाव्या डोळ्याच्या भुवई जवळ जखम झाल्याने त्याचा डावा डोळा दिसत नव्हता. गुन्ह्यातील अनोळखी मयताची ओळख पटविण्याच्या कामी पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ व सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग यांच्या सुचनेप्रमाणे दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. तपासा दरम्यान अर्नाळा पोलीस ठाण्यास गुप्त माहितीदारांमार्फत माहिती मिळाली की दिनांक ९ डिसेंबर २१ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अनोळखी मयत इसम व त्याच्या सोबत सदरच्या परिसरात शेतमजुरीचे काम करणारा 'तेरे नाम' पूर्ण नाव माहीत नाही व आणखी एक इसम असे तिघेजण मुक्काम पाडा परिसरात फिरत होते.
सदर माहितीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अर्नाळा मुक्काम पाडा परिसरात 'तेरे नाम' हे टोपण नाव असलेल्या इसमाचा शोध घेतला असता, तेरे नाम याचे खरे नाव दिनेश मालकरी असून तो भंगार वेचण्याचं काम करीत असल्याची माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने विरार डोंगरपाडा, चिखल डोंगरी भागात शोध घेऊन १) तेरे नाम उर्फ दिनेश रघुनाथ मालकरी राहणार वाडा जिल्हा पालघर २) बुध्या पवार राहणार कामणरोड चिंचोटी ह्यांना ताब्यात घेऊन मयत इसमाची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन यातील मयता सोबत ते फिरले असल्याचे व त्याचे नाव संदीप चौधरी, राहणार पालघर असल्याचे सांगितले. मयताची ओळख पटविण्याकामी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता यातील मयताचे नाव हरेश नथु हाडळ असल्याचे समजले.
तसेच वैदयकीय अधिकारी यांचे कडुन व यातील मयत इसमाच्या डोक्यात गंभीर दुखापती झाल्याने त्यास मृत्यू आल्याचा अभिप्राय प्राप्त झाल्यावर यातील संशयित तेरे नाम उर्फ दिनेश रघुनाथ मालकरी व बुध्या पवार यांच्याकडे कसोशिने विचारपूस केली असता यातील मयत इसम व त्यांच्यामध्ये माशांची (मच्छी) वाटणी व भंगार विक्रीच्या पैश्या वरून वाद झाल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला जीवे ठार मारल्याची माहिती दिली.
सदर घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हाडळ यांनी सरकारतर्फे तक्रार देऊन अर्नाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे दिनांक १६ डिसेंबर २१ रोजी २० वाजून २० मिनिटांनी गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी १) तेरे नाम उर्फ दिनेश रघुनाथ मालकरे वय ३५ वर्ष राहणार मुक्कामपाडा अर्नाळा विरार प. तालुका वसई जिल्हा पालघर, मूळ राहणार आमगाव बरफपाडा मस्तांननाका मनोर तालुका वाडा जिल्हा पालघर व बुध्या उर्फ बुधा रत्ना पवार, वय वर्ष ३०, रा. देवाचाभाट, मुक्काम पाडा, अर्नाळा विरार प. तालुका वसई, जिल्हा पालघर मूळ राहणार भरमपूर चारोटी तालुका डहाणू जिल्हा पालघर यांना अटक करण्यात आली व न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर घटनेबाबत कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा पुरावा नसताना अर्नाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदर गुन्ह्याची कामगिरी श्री. प्रशांत वाघुंंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, चंद्रकांत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. के.माने, पो.उप निरीक्षक हाडळ, तुषार माळोंदे, सलगर, पोलीस यांनी केली आहे.